शिक्रापूर : शिक्रापूर चाकण रस्त्याने प्रवास करणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक बसून एका कार मधील पाच तर एका कारमधील एक असे सहाजण जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना शिक्रापूर जवळ घडली. याबाबत पंडित नंदू साबळे (वय ४० रा. साबळेवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सुनीलकुमार दिपचांद गौर (रा. लोणीकंद ता. हवेली जि. पुणे) या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर चाकण रस्त्याने चाकण बाजूकडून गणेश साबळे हे त्यांच्या काही कुटुंबियांसह कारमधून धर्मिक कार्यक्रमासाठी शिक्रापूर येथे येत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारची धडक साबळे यांच्या कारला बसली. यावेळी साबळे यांच्या कार मधील गणेश दत्तात्रय साबळे, पंडित नंदू साबळे, अश्विनी पंडित साबळे, प्राजक्ता संभाजी साबळे, ज्ञानेश्वरी संतोष काटकर (सर्व रा. साबळेवाडी ता. खेड जि. पुणे) तसेच कार चालक सुनीलकुमार गौर हे गंभीर जखमी झाले तर गौर याच्या कारमधील काही प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले. दरम्यान झालेल्या अपघातात दोन्ही कारचे समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून जखमींवर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.