तळेगाव ढमढेरे (पुणे): येथील शिक्षक भवनजवळ एका किराणा दुकानासमोर शनिवारी (दि. २९) सायंकाळी सव्वा नऊच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओ कारने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या शिक्षकाला धडक देऊन दुचाकीसह फरफटत नेले. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याबाबत जयसिंग बाबूराव येडलापुरे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. संतोष सुखदेव लोखंडे (वय. ४४ रा. तळेगाव ढमढेरे, मुळगाव उरळगाव ता. शिरूर, जिल्हा पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.
शनिवारी संध्याकाळी तळेगाव ढमढेरे बाजू कडून स्कॉर्पिओ (एमएच १२ जे के ९९८१) भरधाव वेगाने शिक्रापूर दिशेने चालली होती. शिक्षक भवनजवळ एका किराणा दुकानासमोर कडेला उभा असलेल्या जयसिंग बाबुराव येडलापुरे यांना धडक दिली व तशीच पुढे दुचाकीलाही जोरदार धडक दिली व फरपटत नेले. गंभीर जखमीला तात्काळ खाजगी दवाखान्यात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. स्कॉर्पिओ चालक तेजस राजेंद्र शिंदे यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.