शिरुर : भरधाव टेम्पो व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला. सदर अपघात मांडवगण फराटा वडगाव रासाई रस्त्यावर बुधवारी (दि.९) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला. याबाबत ऋतिक बंडूसिंग परदेशी (वय २४ रा. गणपतीमाळ, सादलगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या अपघातात बंडूसिंग नारायणसिंग परदेशी (वय ५५ रा. गणपतीमाळ, सादलगाव ता. शिरुर जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
गणपतीमाळ येथील शेतमजुर बंडूसिंग परदेशी हे आपला मोबाइल दुरुस्त करण्यासाठी मांडवगण फराटा येथे नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन गेले होते. घरी पुन्हा येताना सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मांडवगणच्या हद्दीत कोळपे वस्ती जवळ वडगाव रासाई बाजूकडून आलेल्या टेम्पोंची दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.