पुणे: धनकवडीत के. के. मार्केटजवळ एका हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन एक कामगार मृत्युमुखी पडला. हा प्रकार रविवारी (दि. ३०) दुपारी चारच्या सुमारास घडला. आगीमध्ये दोन दुकानांचेही नुकसान झाले..अग्निशामक दलाच्या जवानांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीमुळे मोठी जीवित हानी टळली. या आगीत दोन जण होरपळले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हॉटेलमध्ये दुपारी दूध तापवले जात असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला, त्यामुळे मोठी आग लागली. स्थानिक नागरिकांनी तातडीने या प्रकाराची माहिती अग्निशामक दलाला कळवली. त्यानुसार, कात्रज व गंगाधाम उपकेंद्रातील पथके बंबासह घटनास्थळी रवाना झाली. या पथकांनी पाण्याचा जोरदार मारा सुरु केला. हॉटेलच्या भटारखान्यात असलेले तीन सिलिंडर्स बाहेर काढण्यात आले. आगीमध्ये हॉटेलमधील एका कामगार अडकला असल्याचे लक्षात आले. त्यावर या दलाच्या जवानांनी धाडसाने आता जाऊन या कामगाराला बाहेर काढले. त्याला रुग्णवाहिकेतून तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तो मरण पावला.
अग्निशामक दलाचे अधिकारी सुनील नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मदतकार्य राबवले. सिलिंडर्समधील वायूगळतीमुळे हा प्रकार घडला असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे. यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.