लोणी काळभोर : थेऊर-कोलवडी रस्त्यावर वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो रस्त्याच्या कठड्याला धडकून पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मुळा-मुठा नदी जवळील असलेल्या पुलाजवळ सोमवारी (ता.१८) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.कृष्णा उत्तम पवार (वय 25, रा. मेटा, जि. जालना) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक कृष्णा पवार हा त्याच्या टेम्पोमध्ये दवाखान्यातील वापरलेले कपडे घेऊन रिसायकल करण्यासाठी मेटा येथे घेऊन चालला होता. थेऊर-कोलवडी रस्त्यावरून जात असताना, त्याला वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो रस्त्याच्या कठड्याला जोरदार धडकला. टेम्पो रस्त्याच्या कठड्याला धडकल्याने पलटी झाला.
या अपघातात कृष्णा पवार हा टेम्पोमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल ईश्वर भगत, सोमनाथ गळाकाटे व पोलीस हवालदार महेश करे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टेम्पोमध्ये अडकलेल्या कृष्णा पवार याला त्वरित बाहेर काढले व लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करत आहेत.