लोणी काळभोर (Loni kalbhor): हडपसर-सासवड मार्गावर भरधाव पीएमटीने रस्ता ओलांडणाऱ्या मजुराला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना ऊरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सह्याद्री हॉटेल समोर मंगळवारी (ता.९) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे.
विश्राम भुजंग यादव (वय-४२, सध्या रा. कैलास नगर वडकी, मूळ रा. मु.पो.हरणी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी किरण यादव (वय-३९, रा.मु.पो. हरणी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात पीएमपीएमएल बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण यादव यांचे विश्राम यादव हे नात्याने मोठे भाऊ होते. विश्राम यादव हे वडकी परिसरात कुटुंबासोबत राहत होते. विश्राम हे मजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवीत होते. दरम्यान, विश्राम हे नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता.९) सकाळी कामाला गेले होते. काम आटोपल्यानंतर ते संध्याकाळी घरी परत निघाले होते.
ऊरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीतील सह्याद्री हॉटेल समोर रस्ता ओलांडताना, विश्राम यांना पीएमपीएमएल चालकाने जोरदार धडक दिली. या अपघातात विश्राम यादव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, अज्ञात पीएमपीएमएल बस चालकाने वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात गाडी चालवून विश्राम यादव यांना जोरदार ठोसर मारून त्याच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे, अशी फिर्याद किरण यादव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात पीएमपीएमएल बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.