पुणे : बिबवेवाडी भागातील सुखसागरनगर परिसरात गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री डेअरीला लागलेल्या आगीत आत झोपलेला मालक मृत्युमुखी पडला. हा प्रकार शॉर्टसर्किटमुळे घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. रामदास साळुंके (वय ६५, रा. येरवडा) हे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागात साळुंके यांची किसान डेअरी आहे. दररोज रात्री दुधाच्या गाड्या आल्यानंतर साळुंके डेअरीत झोपायचे. डेअरीतून गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी डेअरीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
डेअरीत मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. रहिवाशांनी या घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिली. कात्रज अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख सुनील नाईकनवरे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीत गंभीररीत्या होरपळलेल्या साळुंके यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.