चाकण: मित्रांसोबत तळ्यात पोहताना कठड्यावरून सूर मारल्यावर खोल पाण्यात पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बराच वेळ लागल्यावर घाबरलेल्या मित्रांनी बुडालेल्या मित्राला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, त्याची हालचाल थांबलेली होती. खेड तालुक्यातील नायफड येथे मंगळवारी (दि.२०) सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. राजेश रामदास वरघट (चय ३५. सध्या रा. शिरोली, ता. खेड, मूळ रा. इटको अंतरगाव, ता. दर्यापूर, जि. अमरावती) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत राजेश याचा भाऊ रोहित वरघट यानी याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मयत राजेश व त्याचे दोन मित्र अनुप घोटे, त्याची व राजेशची पत्नी शालिनी, निशा व भाऊ रोहित हे मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान शिरोली येथून नायफड येथे फिरण्यासाठी आले होते.
नायफड येथे पोहचल्यानंतर येथे असलेल्या छोटया तळ्यामध्ये राजेश वरघट व त्यांचे दोन मित्र पोहण्यासाठी उतरले, त्यावेळी राजेश याने त्या तळ्यामध्ये सूर मारला. काही वेळ झाला तरी तो पाण्याच्या वर आला नाही. मित्रांनी पाण्यात उतरून खोल पाण्यातून राजेशला बाहेर काढले. त्यावेळी राजेशच्या कपाळाला मोठी जखम व रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने डेहेणे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर चांडोली येथे नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणीकरत राजेशला मयत असल्याचे घोषित केले. राजेश हा खेड बाजार समितीच्या आवारात हमाली काम करत होता.