पुणे : पुणे महापालिकेच्या मालकीचा विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा हूक तुटून ठेकेदाराकडील कामगाराच्या डोक्यात पडल्याने संबंधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवार ३ एप्रिल रोजी दुपारी घडली. पांडुरंग म्हस्के (३५, रा. धनकवडी, मूळ रा. जालना) असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पांडुरंग म्हस्के हे इलेक्ट्रिशियनचे काम करीत होते. पुणे महापालिकेच्या वतीने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत नाना पेठ येथे डोके तालीमजवळ जुना विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम केले जात होते. हे काम ठेकेदारामार्फत केले जात होते. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा पुढील भाग पाठीमागे घेत असताना हूक तुटला. हा हुक पांडुरंग म्हस्के या इलेक्ट्रिशियनच्या डोक्यात पडला. त्यानंतर म्हस्के यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी सदर क्रेन जप्त केली असून, याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अक्षय गोरड हे अधिक तपास करीत आहेत.