पुणे : पुण्यात लैंगिक छळ प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसून येत आहे. अशातच महिलेला हरविलेले मांजर शोधून देण्याचे आश्वासन देऊन मोबाईल नंबर घेतला आणि नंतर महिलेला शारीरीक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटना (दि. 14 ऑक्टोबर) रोजी सोमवारी रात्री 8:00 ते 11:00 दरम्यान घडली आहे. याप्रकरणी एका 49 वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी मांजर पाळले होते. परंतु, काही दिवसांपासून मांजर बेपत्ता आहे. हे मांजर हरविले आहे. त्या शोध घेत असतानाही ते मिळालेले नाही. दरम्यान, त्यांच्या येथे राहणाऱ्या अविनाशने हरवलेले मांजर शोधून देतो, असे सांगून त्यांचा मोबाईल क्रमांक मागून घेतला. ‘मांजर शोधून दिल्याच्या बदल्यात तुम्ही माझ्यासोबत तसेच माझ्या बॉससोबत शारीरिक संबंध ठेवा’, असे बोलून त्या महिलेचा विनयभंग केला. त्याबरोबरच तक्रारदारांच्या व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपही पाठविले. एवढेच नव्हे तर ‘मी तुमच्यासाठी जीव देऊ शकतो, तसेच जीव घेऊ शकतो’, असे बोलून महिलेला धमकीही दिली.
दरम्यान, अविनाश नामक आरोपीचे अश्लील कृत्य पाहून पीडितेने चतुश्रुंगी पोलीस स्टेशमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपासही सुरु केला आहे.