थेऊर : गेल्या आठ दिवसांपूर्वी थेऊर (ता. हवेली) येथील महातारी आई मंदिराच्याजवळ एक अपघात झाला होता. या अपघातात अख्तर बिबन सय्यद (वय-२४) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अख्तरचे वडील बिबन सय्यद यांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी बिबन सय्यद यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे केली आहे.
त्यानुसार सागर महादेव धारवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बिबन हाजी सय्यद (वय ५२, रा, थेऊर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अख्तर सय्यद व सागर धारवाड हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे होते. शुक्रवारी (ता. १२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सागर धारवाड याने त्याचा मित्र करण भालसिंग याच्याकडून चारचाकी गाडी आणली होती. ही गाडी सागर चालवीत होता, तर त्याच्या बाजूच्या सीटवर अख्तर बसला होता.
दरम्यान, सागर धारवाड याने भरधाव वेगाने कार चालवली. त्यामुळे सागरचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रस्त्याच्या शेजारी असलेल्या झाडाला धडकून पलटी झाली. या अपघातात अख्तर सय्यद हा गंभीर जखमी होऊन त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला. त्यानंतर जखमी अख्तर सय्यदला उपचारासाठी तातडीने लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सागर धारवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करत आहेत.
अख्तरचा मृत्यू हा अपघाती नसून त्याचा कोणीतरी घातपात केला असावा, असा आम्हाला संशय आहे. लोणी काळभोर पोलिसांकडून अद्यापही याबाबत आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. तरी, पोलीस प्रशासनाने आमच्या मागणीकडे त्वरित लक्ष देऊन, या प्रकरणाचा उलगडा करत दोषींवर कडक कारवाई करावी.
-बिबन सय्यद (अख्तरचे वडील)
सागर धारवाड हा ग्रामपंचायत कर्मचारी असून त्याची आई विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत. अपघात झाल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आपल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही. आपली नोकरी जाईल, या भीतीने सागर अपघाताची विसंगत माहिती देत होता. मात्र, हा अपघात त्याच्याकडूनच झाला असल्याची कबुली सागरने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे हा घातपात नसून अपघातच आहे.
-शिवशांत खोसे (सहाय्यक पोलीस निरीक्षक – लोणी काळभोर पोलीस ठाणे)