पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात आता एका तरूणाला जादा परताव्याचे आमिष दाखवून गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये थोडीथोडकी नाहीतर तब्बल १ कोटी ८० लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली.
संबंधित तरुण पुण्यात शिक्षणानिमित्त आला होता. तो बालेवाडी परिसरात राहत होता. तो मूळचा नगर जिल्ह्यातील असून, शेतकरी आहे. दरम्यान, एका मित्राने त्याची व तोडणकर यांची ओळख करून दिली होती. तेव्हा तोडणकर यांनी त्याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जादा नफा मिळेल, असे सांगितले. गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले.
आरोपींनी या तरूणाकडून वेळोवेळी तब्बल १ कोटी ८० लाख रुपये घेतले. मात्र, जादा परतावा केला नाहीच, शिवाय ते पैसेही परत केले नाहीत. इतकेच नाहीतर त्याला जे काही चेक देण्यात आले ते बाऊन्स झाले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने याबाबतची तक्रार पोलिसांत दिली.
तिघांवर गुन्हा दाखल
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात २५ वर्षीय तरुणाने तक्रार दिली असून, या तक्रारीवरून पोलिसांनी सुशील श्रीकांत तोडणकर, सिद्धार्थ श्रीकांत तोडणकर व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.