पुणे : सैन्य दलातील नोकरीच्या आमिषाने एकाला १२ लाख ३१ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, लष्कर पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल उर्फ दिगंबर हिरामण माहिते, मोहित पवनकुमार सेवक, राजकुमार सारसार असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत तेरुनिसा बाबू शेख (वय. ६०, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शेख यांचा नातू बिलाल याला आर्मीमध्ये नोकरी लावतो, असे तिघांनी सांगत विश्वास संपादन
केला. तसेच बिलाल याच्यावर असलेली फौजदारी केस निल करतो, असे खोटे आश्वासन देऊन शेख यांचे सासरे व पती यांच्या नोकरीच्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम मिळवून देतो, असे सांगून वेळोवेळी १२ लाख ३१ हजार रुपये उकळले. हा प्रकार २०२० ते २०२१ यादरम्यान घडला. शेख यांचा विश्वास संपादन करण्यासाठी खोटा बनावट बँकेचा डीडी पाठवून, तसेच विमानाचे बनावट तिकीट पाठवून हे पैसे उकळण्यात आले. यानंतर कोणतेच काम होत नसल्याचे लक्षात येताच, तेरूनिसा शेख यांनी आरोपींकडे पैसे परत मागितले, त्या वेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.