शिक्रापूर (पुणे) : येथे एका इसमाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येथील गणेश कांबळे हे १६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास दारू पिऊन घरी आले. त्यांनी पत्नी रेश्मासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, पत्नी शेजाऱ्यांच्या घरात जाऊन बसली. काही वेळाने रेश्मा घरात आली असता तिला गणेश यांनी घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
यावेळी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गणेश सतीश कांबळे (वय ४२, रा. विठ्ठल मंदिरजवळ, शिक्रापूर, ता. शिरूर) यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत रेश्मा गणेश कांबळे (वय ३०, रा. विठ्ठल मंदिरजवळ, शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हाडगळे हे करत आहेत.