भोर (Bhor News): सावकाराच्या जाचाला कंटाळून मोरवाडी गावातील दीपक रमेश मोरे (वय ३३) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील मोरवाडी गावातील दीपक रमेश मोरे या तरुणाने गोविंद अहिरे, योगेश उर्फ सोन्या निगडे, संतोष सणस, (रा. किकवी, ता. भोर) या सावकारांकडून ८ लाख ६० हजार रुपये घेतले होते. ते दीपक याच्याकडे ८ लाख ६० हजारांचे २४ लाख रुपये मागत होते. तरुणाने सावकारांना घेतलेल्या पैश्यापेक्षा पाच पटीने पैसे दिले आहेत. तरीही संबंधित सावकारांनी वेळोवेळी तगादा लावत दमबाजी करून एक दिवस अगोदर मारहाण देखील केली होती.
तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली गेली. गोविंद अहिरे, योगेश उर्फ सोन्या निगडे, संतोष सणस, ज्ञानेश्वर मारुती मोरे या सावकारांच्या जाचाला कंटाळून या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आमच्या मुलाने आत्महत्या केली नसून एक दिवस आगोदर या तरुणाला मारहाण करून त्या सावकारांनी आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. याबाबत सुरेखा दिपक मोरे (वय 28 वर्षे, व्यवसाय घरकाम, मुळ रा. लोहकरेवाडी (मोरवाडी), ता. भोर, जि. पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र सावकारी कायदा व आत्महत्येस प्रवृत्त केले नुसार राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक झिंजुरगे करीत आहेत.
भोर तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खाजगी सावकारांनी बस्तान बसविले आहे. या सावकारांच्या पठाणी वसुलीला कंटाळून अनेक जण गाव सोडून गेले आहेत, तर काहींना आपली घरी दारे विकली आहेत. अशा घटना घडू नये म्हणून खाजगी सावकारांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.