पिंपरी : चहाची फ्रेंचाईजी देण्याच्या बहाण्याने एका महिलेची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ९ फेब्रुवारी २०२३ ते १४ जून २०२४ या कालावधीत समर्थ नगर, दिघी येथे घडली. याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज बाबुराव राठोड (रा. जालना) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड याने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून त्यांना चहाची फ्रेंचाईजी घेऊन भागीदारीत व्यवसाय करू, असे सांगितले. त्यासाठी महिलेकडून तीन लाख रुपये घेतले. ते परत न करता व्यवसायासाठी एक लाख रुपये कमी पडत आहेत. घरातील सोन्याचे दागिने असतील तर द्या. दोन-तीन दिवसांत सोन्याचे दागिने सोडवून परत करतो असे महिलेला सांगितले. त्यानंतर महिलेकडून ३०.६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन ते भोसरी येथील मनपूरम फायनान्स येथे गहाण ठेवले. त्यावर एक लाख रुपये कर्ज घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना काहीही माहिती न देता सोने गहाण कर्जावर आणखी टॉप-अप कर्ज घेत फिर्यादीची पाच लाखांची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.