पिंपरी: शेअर बाजाराच्या नावाखाली सीएची साडे १८ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रविवारी (दि. २२) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दत्तात्रय शामराव विभुते (वय ४७, रा. प्राधिकरण, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३४ वर्षीय सीएने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान आकुर्डी आणि निगडी परिसरात घडली. फिर्यादी आणि आरोपीची ओळख शेअर्स मार्केटच्या क्लासमध्ये झाली. इन्व्हेसमेंट प्लॉनमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा तीन ते पाच टक्के परतावा मिळेल, असे आमिष फिर्यादींना दाखविले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून १३ डिसेंबर २०२२ रोजी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून १६ लाख ५० हजार रुपये आणि चार लाख रुपये घेतले.
ट्रेडमध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांचे डिमॅट अकाऊंट वापरून १३ लाख ६५ हजार ३८ रुपयांचे शेअर्स इन्फोलाईन कंपनीकडे प्लॅज (गहाण) ठेवून सदर शेअर्स विकण्यास भाग पाडून असे एकूण ३४ लाख १५ हजार २८ रुपये घेतले. त्यापैकी १३ लाख ६५ हजार ३८ रुपये व नंतर एक लाख ८५ हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम व परतावा न देता आरोपीने फिर्यादीचा विश्वासघात करून १८ लाख ६५ हजार रुपयाची आर्थिक फसवणूक केली.