पुणे : क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवत एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत बुधवारी तीन जानेवारीला हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी बुद्रुक परिसरात राहणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2 ते 15 ऑक्टोबर 2023 दरम्यान घडला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारदार यांना अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप मेसेज पाठवला. क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल, असे सांगत तक्रारदार यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केले.
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास प्रचंड पैसे मिळतात, असे आमिष दाखवत तक्रारदार यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर एका बनावट वेबसाईटच्या आधारे खोटा नफा मिळत असल्याचे दाखवून तक्रारदार यांना एकूण ९ लाख ९२ हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले. मात्र, प्रत्यक्षात ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यामध्ये अडचणी येत होत्या, त्यामुळे तक्रारदार यांनी विचारणा केली. त्यानंतर पैसे काढण्यासाठी आणखी पैसे भरावे लागतील असा तगादा तक्रारदाराकडे लावण्यात आला. यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डगळे करत आहेत.