पिंपरी (पुणे) : बँकेतून बोलत असल्याचे सांगत तसेच नवीन क्रेडिट कार्डची ऑफर असल्याची बतावणी करून एक लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी बुधवारी (दि.२४) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात भामट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ जून ते ३ जुलै या कालावधीत वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली. अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. ट्रॅव्हलिंग आणि नवीन क्रेडिट कार्डची ऑफर आहे, असे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ओटीपी शेअर करण्यास सांगून त्याद्वारे एक लाख ५ हजार ९१४ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.