पिंपरी (पुणे) : खात्यावरची रक्कम परस्पर वळवून तब्बल ८२ लाख २५ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी बुधवारी (दि. ७) वाकड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोपट मुरलीधर नाटकर (वय ५०, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), गोरखनाथ रामनाथ शिंदाडे (वय ३५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संदीप कृष्णा आलम (वय ५३, रा. सेनापती बापट रोड, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १ एप्रिल २०२२ ते २ सप्टेंबर २०२३ या कालावधीत रहाटणी येथे घडला. आरोपी पोपट नाटकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून फिर्यादी यांच्या व्हिजन डेव्हलपर्स आणि बिल्डर्स फर्मचा विश्वासघात करून ८२ लाख २५ हजार ३७० रुपये रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून फिर्यादी यांच्या फर्मची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.