शिक्रापूर : येथील इसमाला फेसबुकवरून झालेल्या ओळखीतून एका परप्रांतीयाने ऑनलाइन पैसे गुंतवून जादा नफा देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५० लाख ५० हजारांचा गंडा घातला. योगेश दिनकर पवार (वय ३५, रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी सिरपा थापर (रा. लखनऊ गौतमीनगर, उत्तरप्रदेश) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
योगेश पवार यांना त्यांच्या फेसबुकवर सिरपा थापर याने मेसेज पाठवून व्यवसाय बाबत चर्चा करुन मी ऑनलाइन गुंतवणूक करुन लाखो रुपये नफा कमवत असल्याचे दाखवून एक लिंक पाठवून त्यामध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. दरम्यान, योगेश यांनी त्या लिंकमध्ये ५० हजार रुपये गुंतवले असता दुसऱ्या दिवशी त्यांना १४ हजार रुपयांचा नफा मिळाल्याचे दिसले. योगेश यांनी काही रक्कम काढून घेतल्याने त्यांना विश्वास बसला. त्यानंतर योगेश यांनी थापर याने दिलेल्या खात्यावर बँकेतून वेळोवेळी ५० लाख रुपये ट्रान्सफर केले.
मात्र पन्नास लाख रुपये गुंतवल्यानंतर सदर इसमाने पाठवलेली लिंक ओपन होत नसल्याचे लक्षात आल्याने योगेश यांनी त्या इसमाला संपर्क करत मला पैसे काढायचे असल्याचे सांगितले. मात्र, तुमच्या खात्यावर एक कोटी रुपये झाल्याशिवाय पैसे काढता येणार नसल्याचे सांगत सिरपा थापर याने बोलण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर थापर याच्याशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने योगेश पवार फिर्याद दिली.