पुणे : कुरिअरने पाठविलेल्या पाकिटात परदेशी चलन, अमली पदार्थ सापडल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी विश्रांतवाडी भागातील तरुणाची ३५ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर विक्रमसिंह जाधव असे नाव सांगणाऱ्या चोरट्याने संपर्क साधला. तुमच्या मित्राने कुरिअरद्वारे पाठवलेले पार्सल विमानतळावर जप्त केले आहे. या पाकिटात परदेशी चलन, अमली पदार्थ सापडले आहेत. काळ्या पैसा व्यवहारात चौकशी करून अटक करण्यात येणार असल्याची भीती या सायबर भामट्यांनी दाखवली. अटक, तसेच कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी बतावणी त्यांनी केली.
चोरट्यांनी तरुणाकडून ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी ३५ लाख रुपये घेतले. चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर आणखी पैशांची मागणी करण्यात आली. तरुणाला संशय आल्याने त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मोहन खंदारे तपास करीत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), अमली पदार्थ विरोधी विभागाकडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.