पुणे : व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर संपर्क करत पार्ट टाइम जॉब देण्याच्या आमिषाने एकाला १६ लाख ५० हजार ८९४ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर २०२३ या दरम्यान घडला.
अंजनकुमार (वय ४८, रा. श्रेयस श्री बुड्स सोसायटी, धानोरी) यांनी याबाबत फिर्यादी दिली आहे. अज्ञात मोबाईल आणि टेलिग्राम धारक आरोपींनी अंजनकुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांना व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम वरून मेसेज पाठविण्यात आले. पार्ट टाइम जॉब देण्याचे अमिष त्यांना दाखवण्यात आले. या कामासाठी त्यांना वेगवेगळे टास्क देखील देण्यात आले. त्यानंतर काम पूर्ण झाल्यावर त्यांना सुरुवातीला थोडा मोबदला देण्यात आला. मात्र, त्यानंतर कामाचा मोबदला पाहिजे असल्यास थोडे पैसे भरायला भाग पाडले. नंतर ही कंपनी बदलल्याचे सांगून वेगळ्या अकाउंटवर पैसे भरायला लावले. असे करत त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायला लावत त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक करण्यात आली.