पिंपरी : नोकरीच्या शोधात असलेल्या एक तरुणाची १२ लाख ७१ हजार ५७४ रुपयांची फसवणूक केली. ही घटना निगडीतील यमुनानगर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय तरुणाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ११ अज्ञात बँक अकाउंट धारक, मोबाइल धारक व ग्रुप अॅडमीन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना फोन केला. फिर्यादी यांना नोकरीची गरज आहे, याची खात्री करून टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. फिर्यादी यांना १० टक्के नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करत त्यांना वेगवेगळ्या बँकेत १२ लाख ७१ हजार ५७४ रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांची मूळ रक्कम तसेच नफा याची रक्कम परत न देता फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.