पुणे : मारहाण केल्याचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत एका तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्याशिवाय, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भावाला व आईला मारहाण करुन किरकोळ जखमी केले आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करुन दोन जणांना अटक केली आहे.
मारहाणीचा हा प्रकार रामनगर येथील डोंगरवाडी येथे शुक्रवारी (दि.22) रात्री अकराच्या सुमारास घडला. याबाबत आकाश दिवेकर (वय-28 रा. डोंगरवाडी रामनगर, वारजे माळवाडी) याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी अमरजीत मुन्ना सिंग, रोहन चव्हाण यांना अटक केली आहे. तर राहुल ठाकुर, दाद्या गायकवाड, निल्लू सोलापुरी, योगेश करंजकर, गुड्ड्या पट्टेकर (सर्व रा. रामनगर, वारजे) यांच्यावर आयपीसी 326, 143, 147, 149, 336, 323, 504, 506, 427, सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश दिवेकर हे घरी झोपले असताना घराच्या बाहेर दगड पडल्याचा आवाज आला. त्यामुळे आकाश त्याचा भाऊ व आई घरातून बाहेर आले. त्यावेळी आकाशचा मित्र बाबु चव्हाण याला आरोपींनी पकडून निलू सोलापुरे याला मारहाण केली म्हणून पकडले होते. आकाशने मध्यस्ठी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी वाद घातला. त्यानंतर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आकाशचा भाऊ व त्यांची आई भांडण सोडवण्यासाठी गेले असताना तुम्ही मध्ये का पडता? असे म्हणत आरोपींनी आकाशच्या आईच्या डोक्यात वीट मारुन जखमी केले. भावालाही मारहाण केली.
त्यानंतर, आरोपींनी जमलेल्या लोकांना शिवीगाळ करुन हातातील हत्यारे उगारुन दहशत निर्माण केली. तसेच तुला उद्याचा सुर्य बघू देणार नाही अशी धमकी फिर्यादी आकाश याला दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दुगावकर करत आहेत.