जुन्नर: निवृत्त शिक्षक आई आणि वडिलांना मुलाकडून दारु पिऊन मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी जानेवारीला जुन्नर येथे घडली आहे. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय सिताराम देशमुख (वय 79 रा. हिवरे, जुन्नर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर मुलगा मोहित दत्तात्रय देशमुख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नी हे दोघेही निवृत्त शिक्षक आहेत. त्यांना मोहीत हा एकुलता एक मुलगा आहे. मात्र, मोहित याला दारुचे व्यसन आहे, शिवाय तो कोणताही व्यवसाय किंवा धंदा करत नाही. उलट फिर्यादी यांनाच शिवीगाळ करणे, दमदाटी करणे , मारहाण करणे असा त्रास देतो. मी तुमचा कसलाही सांभाळ करू शकत नाही , तुम्ही इथून निघून जा, असे सांगत असतो.
येथे राहिलात तर तुमचा एक दिवस घात करेन अशी धमकी देत होता. तसेच त्याने सोमवारी देखील आई आणि वडिलांना घराबाहेर काढत मारहाण केली व घराचा दरवाजा लावून घेतला. शेवटी आई-वडिलांनी पोलिसांची मदत घेत मुला विरोधात तक्रार दाखल केली असून ओतूर पोलीस पुढील तपास करत आहेत.