पिंपरी : तरुणाला जिवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सोमवारी (दि. १५) पाच जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन तानाजी राजपूत (वय ३०, रा. घोटावडे फाटा, पौड) आणि त्याच्या तीन ते चार साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय प्रभुलाल नट (वय २५, रा. गवारवाडी, माण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ एप्रिल रोजी गवारवाडी माण येथे घडली. आरोपी हातामध्ये लाकडी दांडके घेऊन गवारवाडी येथे आले. त्यांनी परिसरात दहशत पसरवली. त्यानंतर आरोपी सचिन राजपूत याने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा भाऊ आणि बहीण आले असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण केली. ‘मी सांगेन तसे तुम्ही वागले नाही तर मी मारून टाकीन’ अशी आरोपींनी धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.