शिक्रापूर (पुणे) : शिक्रापूर एका भंगार व्यावसायिकाने दौंड तालुक्यामधील पाठेठाण गावातून दोन मुलांना पळवून आणल्याची जोरदार अफवा पसरली. त्यानंतर नागरिकांनी भंगार व्यावसायिकाची गाडी आडवली आणि ती फोडली. तसेच त्याला बेदम मारहाण देखील केली. मात्र, मुलांना पळवून आणले ही अफवा असल्याचे समजताच मारहाण करणाऱ्या नागरिकांनी येथून पळ काढला.
शिक्रापूर- तळेगाव रस्त्यालगत नागरिकांनी मुलांना पळवून आणल्याचा संशयातून एकाला पडकून बेदम मारहाण केली. तसेच त्यांची गाडी फोडत मोठे नुकसान केले. दरम्यान, त्यानंतर त्यांना तळेगाव ग्रामपंचायतीसमोर नेण्यात आले. यावेळी लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणावर जमा झाला होता. दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलिस हवालदार किशोर तेलंग, विकास पाटील, पोलिस नाईक अमोल नलगे, रोहिदास पारखे, प्रफुल्ल सुतार, नारायण सानप, अंकुश चौधरी, तळेगाव ढमढेरेचे पोलिस पाटील पांडुरंग नरके यांनी घटनास्थळी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर यवत पोलिस ठाण्याचे पोलिस देखील घटनास्थळी पोहचले.
त्यानंतर अधिक चौकशी केली असता एका भांडी आणि भंगार व्यावसायिकाने दौंड तालुक्यातील पाठेठाण येथून महिलेकडून काही भंगार घेतले. भंगार व्यावसायिकाकडे महिलेला देण्यासाठी पूर्ण पैसे नसल्याने त्याने मी मुलांकडे पैसे देतो. माझ्यासोबत पाठवता का?असे म्हटल्याने सदर महिलेने मुलांना त्यांच्यासोबत पाठवले होते. त्यानंतर पाठेठाण परिसरातून मुले पळवून नेल्याची अफवा काही क्षणात वाऱ्यासारखी पसरली होती. दरम्यान, शिक्रापूर येथून पैसे घेऊन मुलांना परत सोडायला जात असताना पाठेठाण येथून आलेल्या युवकांनी भंगार व्यावसायिकाला पकडून बेदम मारहाण केली.
सदर मारहाणीबाबत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी यावेळी केले. अधिक तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.