पुणे: पुण्यामध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यांच्या घटना कानावर पडत आहेत. शहरालगतच्या फुरसुंगी ता. हवेली) येथे दुकानदाराने गोळ्या औषधे उधार दिली नाहीत, म्हणून दुकानात घुसून चाकूने हातावर, डोक्यावर वार करून जखमी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. वैभव तुकाराम मखरे (रा. फुरसुंगी, हडपसर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मनोज सुदाम आडगळे (वय ४०, रा. फुरसुंगी, हडपसर) याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १०) सायंकाळी ६.३० च्या सुमारास फुरसुंगीतील खंडोबामाळ येथील शिवश्री मेडिकल येथे घडली.
आरोपीने फुरसुंगीतील शिवश्री मेडिकलमध्ये औषध-गोळ्या उधारीवर मागितल्या. आमच्या दुकानात उधारीवर ओषधे दिली जात नाहीत, असे दुकानदाराने सांगितले. त्याचा राग मनात धरून दुकानात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केली. भाजी कापण्याच्या चाकूने जखमी केले. जखमेतून रक्त येत असल्याचे पाहून आरोपी पळून गेला. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गुंडांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान
आयटी हब, सांस्कृतिक राजधानी, पेन्शनरांचे पुणे शहर अशी अनेक बिरुदावली लागलेल्या शहरात काय चाललं आहे. आता गुन्हेगारीचे शहर अशी ओळख निर्माण होणार की काय, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली. मागील आठ महिन्यांत तब्बल ६५ जणांचे खून झाले, तर ९९ जणांवर खुनी हल्ले झाले आहेत. त्यातच १ सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांच्या खुनामुळे टोळीयुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत पोलिसांसमोर गुंडांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.