पुणे : तंबाखू मागण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी तरुणाच्या डोक्यात हातोडी मारून त्याच्याकडील वस्तू लुबाडल्याचा प्रकार रविवारी (दि. २९) मध्यरात्री खराडी परिसरात घडला. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी तपास जारी केला आहे.
या हल्ल्यामध्ये आकाश बाबासाहेब आगळे (वय २०, रा. विठ्ठलनगर, खराडी) जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आकाश सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तो रविवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरला निघाला होता. दुचाकीवरून आलेल्या चौघा चोरट्यांनी खराडी परिसरात त्याला अडवून तंबाखू मागितली. तेव्हा त्याने आपल्याकडे तंबाखू नसल्याचे सांगितले. आकाश त्यांच्याशी बोलत असतानाच अचानक त्यांच्यापैकी एकाने अचानक त्याच्या डोक्यात हातोडी मारली. त्यामुळे तो जागीच कोसळला. त्यानंतर, त्याच्याकडील पिशवी घेऊन चोरटे पसार झाले.
आकाशने स्थानिक नागरिकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण, ते हाती लागू शकले नाहीत. चंदननगर पोलीस ठाण्यात या लुबाडणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.