पुणे: दारूच्या नशेत दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीला घेऊन जात असतानाच आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही घटना शनिवारी (६ जानेवारी) संध्याकाळी सातच्या सुमारास हडपसर येथील श्रीराम चौकासमोर असलेल्या पुणेरी स्वीट होममागे घडली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश धायकू नाईक (वय ३९, रा. ससाणे नगर, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या ३२ वर्षीय वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या परिवारासह हडपसर येथील श्रीराम चौकासमोर असलेल्या पुणेरी स्वीट होमजवळ राहण्यास आहेत. फिर्यादी यांची दोन वर्षांची मुलगी घरासमोर अन्य मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने या मुलीला उचलून घेत कोणाला काही न सांगता तो या मुलीला घेऊन जाऊ लागला.
फिर्यादी यांचे काही नातेवाईक त्याच परिसरात राहण्यास आहेत. त्यांना मुलगी खेळत असताना दिसेनाशी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच तिचा शोध सुरू केला. त्यावेळी या मुलीला आरोपी नाईक घेऊन जात असल्याचे दिसले. नातेवाईकांनी त्याला तत्काळ अडवले. त्याच्याकडून मुलीची सुटका केली. त्याला पकडून ठेवत पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली.
घटनास्थळी दाखल झालेल्या गस्तीवरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आरोपी नाईक हा मद्यपी असून तो काम धंदा करीत नाही. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.