पिंपरी : वृद्ध महिलेला मदत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना एका व्यक्तीने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तसेच इथले आमदार माझ्या ओळखीचे आहेत. तुमची नोकरी या ठिकाणी कशी होते, तेच बघतो अशी धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. ३) दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास माकन चौक, जुनी सांगवी येथे घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विजय साठे (वय ५१, रा. माकन चौक, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रवीण पाईकराव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार प्रवीण पाईकराव आणि पोलीस अंमलदार गुव्हाडे हे सांगवी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. मंगळवारी दुपारी ते मार्शल पेट्रोलिंग करत होते. जुनी ‘सांगवी येथे एका वृद्ध महिलेला मदतीची गरज असल्याने प्रवीण पाईकराव आणि गुव्हाडे महिलेच्या मदतीला गेले. मदत करत असताना आरोपी विजय साठे तिथे आला. तो दारू पिलेल्या अवस्थेत होता. त्याने पोलिसांना धक्का देऊन ढकलून दिले.
अश्लील शिवीगाळ करत तुमची नोकरी या ठिकाणी कशी होते तेच बघतो. माझ्या ओळखीचे इथले आमदार आहेत, अशी धमकी दिली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार प्रवीण पाईकराव पुढील तपास करीत आहेत.