पुणे: पुणे पोलीस ठाण्यात दिलेला तक्रार अर्ज मागे घेतो. त्याबदल्यात सिक्युरिटी एजन्सी मालकाकडे २५ लाखांची खंडणी द्या, अशी मागणी करणाऱ्या मुंबईतील एका जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
विजय जतन लोंढे (रा. धोबीघाट, पाटीलवाडी, संतोषी माता रोड, दहिसर पश्चिम, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लोंढे याचा साथीदार अमर कसबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, याबाबत एका निवृत लष्करी अधिकाऱ्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची धमकी लोंढे आणि कसबे यांनी सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाला दिली होती. त्यानंतर दोघांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी दोघांनी त्यांच्याकडे २५ लाखांची खंडणीची मागणी केली. तुमच्या कार्यालयाजवळ एक जण येईल, त्याच्याकडे २५ लाख रुपये द्या, असे लोंढे आणि कसबे यांनी सिक्युरिटी एजन्सी मालकाला सांगितले. तसेच पैसे दिल्यानंतर त्वरित तक्रार अर्ज मागे घेतो, असे दोघांनी सांगितले. त्यानंतर सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाने पोलिसांकडे तक्रार दिली.
याप्रकरणी एनआयबीएम रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. सिक्युरिटी एजन्सी मालकाने एका पिशवीत ५० हजार रुपये आणि कागद भरले. लोंढे इमारतीच्या परिसरात थांबला होता, सिक्युरिटी एजन्सी मालकाने त्याच्याकडे पिशवी दिली. त्याचवेळी पोलिसांनी लोंढे याला पकडले. सहायक निरीक्षक राजेश उसगावकर, गणेश चिंचकर, अभिजित जाधव, सोमनाथ महानवर, तुषार डिंबाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.