लोणी काळभोर : किचनमध्ये वाहिनी एकटी काम करीत असल्याच्या गैरफायदा घेऊन दिराने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोरजवळील एका गावात बुधवारी (ता.१०) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३३ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व पिडीत महिला या नात्याने दीर आणि भावजय आहेत. हे दोघेही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकत्रित कुटुंबात राहत आहेत. दरम्यान, फिर्यादी या नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी घरातील किचनमध्ये भांडी घासत होत्या. फिर्यादी या किचनमध्ये एकटीच असल्याचे पाहुन आरोपी अर्धनग्न अवस्थेत किचनमध्ये आला. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन करून फिर्यादी यांचा विनयभंग केला. तसेच मला तू एकटी कधी सापडतेय, याचीच वाट बघत होतो, असे म्हणुन फिर्यादी यांना विवस्त्र करण्याचा उद्देशाने पकडले. त्यावेळी फिर्यादी यांनी प्रतिकार करीत आरोपीला ढकलून दिले. ढकलून दिल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या गालावर चापट मारुन शिवीगाळ केली.
याप्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने दिराच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.