केडगाव (दौंड) : पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यातील पंडिता रमाबाई मुक्तीमिशन येथे 3 अल्पवयीन आणि एका सज्ञान मुलीचा विनय भंग करण्यात आल्याची घटना घडली होती. आता या प्रकरणी यवत पोलिसांनी आरोपी भास्कर निरूगट्टी (वय 53 वर्षे संस्थेत) याला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भास्कर निरूगट्टीवर भादंवि कलम 354 (A) सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 10,12 सर अ.जा.ज.प्र.का.क.3 (1) (w) (i), 3 (2) (va) या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 17 एप्रिल 2024 रोजी 06:00 ते 06:30 च्या दरम्यान बोरीपार्धी येथील पंडिता रमाबाई मुक्ती संस्थेतील एलिम गार्डन येथे हा गुन्हा घडला होता. यामध्ये 3 अल्पवयीन आणि एक सज्ञान मुलगी यांच्यासोबत नराधम आरोपी भास्कर निरूगट्टी हा विचित्र चाळे करून त्यांचा विनयभंग करत होता. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.
दरम्यान या घटनेची तक्रार मुलींनी तेथील एका महिला कर्मचाऱ्याला केली. त्यानंतर महिला कर्मचाऱ्याने हे प्रकरण रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले. या प्रकाराची भनक या नराधम कर्मचाऱ्याला लागताच तो फरार झाला होता.
तर संस्थेमध्येच काम करणारी त्याची पत्नी या धक्क्यातून आजारी पडल्याने तिला तिच्या माहेरी पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या संस्थेत एवढी भयानक घटना घडल्यानंतरही पोलिसांना याची खबर का दिली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संस्थेतील वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण दाबत तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये या संस्थेच्या कार्यापद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोर्चेही काढले आहेत. या संस्थेतील मुलींच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन येथील कर्मचारी त्यांच्याशी दुष्कर्म करत असल्याच्या घटना या अगोदर देखील घडल्या आहेत. या प्रकरणाबाबत पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, रमामाई मुक्ती मिशन या संस्थेची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. असं असताना आता पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेची नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. आज (दि. १३)अखेर असाह्य मुलींचा गैरफायदा घेणाऱ्या फरार नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.