पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी शहरात सर्वत्र मतदानासाठी पोलिसांची करडी नजर होती. त्यातही शक्कल लढवत तिघांनी तरुणाचे हातपाय बांधून अपहरण केल्याची तक्रार आली. अगोदरच अलर्ट असलेली पोलीस यंत्रणा आणखी सजग होते. अपहरण झालेल्या तरुणाचा शोध घेतला असता तो एका झाडाखाली चक्क डबा खात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर खरा प्रकार समोर आला.
याप्रकरणी एका ६१ वर्षांच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते घरी असताना त्यांच्या ४३ वर्षांच्या मुलाच्या मोबाईलवरून फिर्यादीचा मोठा मुलगा याला त्याच्या मोबाईलवर फोन आला. त्याला तीन-चार अनोळखी मुलांनी पकडून त्याचे हात पाय बांधून घेऊन निघाले आहेत, असे कळविले. त्यांनी मुलाचे अपहरण केल्याचे सांगितले. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेऊन तातडीने तपासाला सुरुवात केली.
मुलाच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्यात आले. ते लोहगाव परिसरात निघाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, हसन मुलाणी व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथकाने लोहगाव परिसरात शोध सुरू केला. त्यानुसार एका झाडाखाली हा तरुण चक्क एकटाच डबा खात बसल्याचे दिसून आले. डबा खाता खाता तो जंगली रम्मी खेळत होता. हे सर्व पाहून पोलिसांना उलगडा झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
४३ वर्षांचा हा तरुण बी. जे. शिर्के कंपनीत अँगल कटिंगचे काम करतो. त्याला काही महिन्यांपासून जंगली रम्मी खेळण्याचे व्यसन लागले आहे. त्यासाठी त्याने मित्र, नातेवाइकांकडून थोडे थोडे करीत साडेतीन लाख रुपये उसने घेतले. आता हे लोक पैसे परत मागण्यासाठी घरी येऊ लागले. त्यातून वाद सुरू झाले. तेव्हा त्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने अपहरण झाल्याचा बनाव रचला व मोठ्या भावाला फोन केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करीत आहेत.