यवत : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवत पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी बोरीऐंदी गावाच्या हद्दीतील कोळसा कंपनीजवळ बोरीऐंदी ते ताम्हाणवाडी रस्त्याच्या कडेला एकजण गावठी पिस्तूल जवळ बाळगून उभा असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असता त्याच्याकडून एक लोखंडी गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा ५० हजारांचा मुद्देमाल आढळला.
संतोष पांडुरंग हिंगणे (वय ५४, रा. ताम्हाणवाडी, ता. दौंड, जि.पुणे) असे या व्यक्तीचे नाव आहे. संतोष हा कमरेस एक लोखंडी गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण ५० हजार रुपयांचा माल जवळ बाळगला असताना मिळून आला. याप्रकरणी आरोपीविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
दरम्यान, ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश कदम, गुरू गायकवाड, रामदास जगताप, महेंद्र चांदणे, अक्षय यादव, पोलीस नाईक उमेश गायकवाड यांचे पथकाने केली.