राजगुरुनगर: पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणारे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. दि. २१ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो. नि. अविनाश शिळीमकर यांच्या आदेशान्वये खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना पो.हवा. संदीप वारे व पो.कॉ. अक्षय नवले यांना राजगुरूनगर गावच्या हद्दीत होलेवाडी येथील पुलाखाली प्रथमेश बोऱ्हाडे हा त्याच्या एका साथीदारासह येणार असून त्यांच्या जवळ एक गावठी पिस्टल असल्याचे समजले.
त्यानुसार पथकाने सापळा लावून प्रथमेश रमेश बोऱ्हाडे (वय २५, रा. पाबळ रोड), सुनील बबन पाचपुते (वय २६ रा.चिंचोशी ता. खेड) यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता सुनील याच्या कमरेला गावठी कट्टा मिळून आला. हा कट्टा प्रथमेश बोऱ्हाडे याने दिल्याचे त्याने सांगितले आहे. त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. याबाबत खेड पोलिस स्टेशन येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हवा. दिपक साबळे यांनी फिर्याद दिली असुन गुन्हा दाखल केला आहे.