पिंपरी: वारजे परिसरात मतदान संपल्यानंतर दहशत पसरविण्यासाठी गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनने पिंपरीत जेरबंद केले. आरोपीकडून गोळीबार केलेले पिस्तूल जप्त केले आहे. सिद्धाप्पा मलिकार्जुन यळसंगीकर (वय ३५, रा. कोथरूड डेपो, मूळ रा. येळसंगी, ता. आळंद जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वारजेमधील काही भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. मंगळवारी (दि. ७) बारामती लोकसभेसाठी मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र, मतदान झाल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास वारजे परिसरातील रामनगरमधील भीमशक्ती चौकात तिघेजण दुचाकीवरून आले. एकापाठोपाठ त्यांनी तीन गोळ्या रस्त्यावर झाडल्या आणि पळून गेले. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र, गोळीबाराच्या घटनेने वारजे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत पुणे पोलिसांकडून पिंपरी-चिंचवड पोलिसांना देखील माहिती देण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी याबाबत गुन्हे शाखांना अलर्ट दिला होता.
दरम्यान, बुधवारी (दि. ८) रात्री पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ सीटी प्राईड हॉटेलजवळ एकजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे कर्मचारी सागर अवसरे व अजित सानप यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून सिद्धाप्पा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल जप्त केले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वारजे येथे मंगळवारी रात्री गोळीबार केल्याची कबुली दिली. आरोपी सिद्धप्पा याने त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसोबत मिळून वारजे येथे गोळीबार केला, त्यानंतर त्याचे दोन अल्पवयीन साथीदार पकडले गेले. पोलिसांपासून लपण्यासाठी तो बुधवारी पिंपरी – चिंचवड परिसरात आला. सिद्धप्पा याच्यावर गुलबर्गा जिल्ह्यातील येळसंगी पोलीस ठाण्यात खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर सुटला असून पुण्यात कामासाठी आला आहे. पोलिसांकडून याबाबत खातरजमा केली जात आहे. दरम्यान, पैसे घेऊन त्याने गोळीबार केल्याची शहरात चर्चा आहे. मात्र, गोळीबार कोणाच्या सांगण्यावरून केला? तसेच पिस्तूल कोठून आणले? याबाबत तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी सांगितले.