कामशेत : भजन करून दुचाकीवरून घरी जात असताना भरधाव कारने धडक दिल्याने नायगाव येथील चोपडे दाम्पत्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. शनिवारी (दि. ५) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात कामशेत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्याने कार चालकाचा शोध घेणे हे मोठे आव्हान कामशेत पोलिसांपुढे होते.
मात्र पोलिसांच्या तपासाला यश आले आहे. सदर गुन्ह्यातील काळ्या रंगाची थार चारचाकी गाडी शोधणे आव्हानात्मक होते. सदर हीट अँड रन प्रकारात क्लिष्ट व किचकट तपास प्रक्रिया पार पाडून कामशेत पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेडगे, पोलीस उपनिरीक्षक अब्दुल शेख, पो. ह. गणेश तावरे, जितेंद्र दीक्षित, सुहास सातपुते, पो. कॉ. अमोल ननवरे, गवारी, प्रतीक काळे, होमगार्ड बोंबले यांच्या पथकाने शिताफिने सदर प्रकरणाचा तपास करून अपघात केलेली थार गाडी ताब्यात घेऊन त्यावरील चालक आरोपी राहुल बिराजदार (रा. जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे) यास अटक केली आहे.