पुणे : हांडेवाडी परिसरात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पोटात लाथ मारणाऱ्याला पोलिसांनी रविवारी (दि. ११) अटक करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती राजाराम माने (वय २२, रा. गोपाळपट्टी, मांजरी) असे अटक केलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सोनू पाटकर, तसेच आणखी एका मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी हांडेवाडी वाहतूक विभागातील पोलीस शिपाई अजिंक्य नानगुडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलीस शिपाई नानगुडे हांडेवाडी परिसरात शनिवारी (दि. १०) सायंकाळी वाहतूक नियमन करीत होते. मोटारचालक मारुती माने याने कोंडीतून मोटार नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी नानगुडे यांनी त्याला मोटार थांबविण्यास सांगितले.
माने आणि मोटारीतील साथीदार पाटकर यांनी नानगुडे यांना शिवीगाळ केली. नानगुडे यांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्याने माने याने त्यांच्या पोटात लाथ मारली. त्या वेळी अन्य एका मोटारचालकानेही त्यांना शिवीगाळ केली. यासंदर्भात, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मोटारचालक मानेला अटक करण्यात आली.