पुणे : बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेने पकडले. चोरट्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, चार काडतुसे, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय ३७, रा. दारूवाला पूल, सोमवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रोहन चव्हाणविरुद्ध यापूर्वी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. मध्य प्रदेशातून पिस्तूले आणून त्याने शहरातील गुंड टोळ्यांना विक्री केली होती. तो एरंवडणे भागातील डीपी रस्त्यावर थांबला होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे सहायक पोलीस फौजदार सुनील पवार आणि संतोष क्षीरसागर यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे पिस्तूल सापडले.
चव्हाणकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह चार काडतुसे, दुचाकी जप्त करण्यात आली. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सुनील पवार, संतोष क्षीरसागर, शरद वाकसे, पांडुरंग कामतकर, किरण पवार, संजीव कळंबे, सुजीत पवार यांनी ही कारवाई केली.