हडपसर, (पुणे) : मागील अनेक दिवसांपासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-6 च्या पोलिसांनी मांजरी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतून अटक केली. राक्या ऊर्फ राकेश देविदास थोरात (वय 23, रा. जुना हापसा, मांजराई नगर, मांजरी ब्रु. ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट-6 च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्का तसेच इतर गंभीर गुन्ह्यातील ‘वॉन्टेड’ आरोपीला शोधमोहिम राबवण्याबाबत पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट-6 चे पथक हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिस अमंलदार नितीन मुंढे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशनकडील मोक्कातील ‘वॉन्टेड’ आरोपी तसेच तडीपार राक्या ऊर्फ राकेश थोरात हा भापकर मळा, मांजरी या ठिकाणी थांबलेला आहे.
मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, मांजरी यथे जाऊन सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने माहिती दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने तडीपार असताना गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेचा आवाज कमी करण्याच्या कारणावरुन रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील ऊर्फ बिट्या कुचेकर व आम्ही इतर साथीदारांनी मिळून एकास जबर मारहाण केल्याची कबुली पोलिसांना दिली.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा, युनिट-6 चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.
हडपसर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल
हडपसर पोलीस ठाण्यात गुन्ह्याचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात राक्या ऊर्फ राकेश देविदास थोरात हा मोक्कातील वॉन्टेड आरोपी असल्याची खात्री झाल्याने पुढील तपासासाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.