शिक्रापूर (पुणे): रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथून एका युवकाला त्याच्यावरील गुन्ह्याबाबत चर्चा करायची आहे, असे सांगत पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण केले होते. तसेच कोयत्याने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्यानंतर तब्बल सात महिन्यांपासून, फरारी असलेल्या आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. प्रवीण दादाभाऊ वाळके (रा. बाभूळसर ता. शिरुर जि. पुणे) असे या युवकाचे नाव आहे. रांजणगाव गणपती येथील अजित ढेरंगे या युवकाला १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रवीण वाळके सह एक महिला आणि त्याच्या साथीदारांनी चर्चा करण्यासाठी बोलावून पिस्तुलाच्या धाकाने कारमध्ये बसवून, कोयत्याने वार केला असता सदर घटनेत अजित ढेरंगे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले.
याबाबत अजित हनुमंत ढेरंगे (वय २३ रा. कुरुंद ता. पारनेर) याने दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रवीण वाळके समीर उर्फ सोन्या तीरखुंडे, सागर तीरखुंडे, सुजाता संजय भोंडवे (सर्व रा. भांबर्डे ता. शिरुर), हर्षद गोसावी (रा. बाबुरावनगर शिरुर ता. शिरुर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत समीर उर्फ सोन्या तीरखंडे, सागर तीरखुंडे, सुजाता संजय भोंडवे यांसह एका युवकाला अटक केली होती. मात्र, प्रवीण वाळके व हर्षद गोसावी फरारी होते. प्रवीण वाळके निमगाव भोगी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला अटक केली.