माळेगाव: नीरा नदी प्रदूषणाचे कारण पुढे करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार सत्ताधारी संचालक मंडळाने तूर्तास माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा इथेनॉल निर्मिती प्रकल्पास स्थगिती दिल्याचे सांगितले. मात्र, स्थगितीचे खरे कारण अद्याप गुलदस्त्यात ठेवले असून, त्याबाबत सभासदांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मागील वर्षीच्या सर्व साधारण सभेत सत्ताधारी संचालक मंडळाने २.४० लाख लीटर क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. मात्र, खोटे प्रोसेडिंग लिहून हा प्रकल्प मंजूर केल्याचा दावा विरोधकांनी करून, हा प्रकल्प ५ लाख लीटर क्षमतेचा करावा, यासाठी विरोधकांनी जनजागृती करून रान पेटवले होते. याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधाऱ्यांनी देखील जनजागृती करून गावोगावी सभांचा धडाका सुरू ठेवला होता.
मात्र, अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरा नदीचे होणारे जल प्रदूषण व शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे या प्रकल्पाला स्थगिती देण्याची सूचना सत्ताधाऱ्यांना दिल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र, या स्थगितीवरून विरोधक, तसेच सभासदांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले असून, वार्षिक सभेत नेमकी कशी चर्चा होणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
खासदार शरद पवार सभेला उपस्थित राहणार?
वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी खासदार शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली. एरवी गळीत हंगामासाठी मोळी टाकण्यासाठी किंवा एखाद्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येणारे खा. शरद पवार वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहणार असून, ते काय बोलतात? याकडे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणूक व पुढील वर्षी होणाऱ्या कारखान्याच्या निवडणुकीबाबत पवारांची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.