पुणे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती कारखान्याची निवडणूक सुरू झाली, तर बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कधी जाहीर होणार? याकड़े सत्ताधारी संचालक मंडळ, विरोधक व तिसऱ्या आघाडीचे लक्ष लागले आहे. मध्यंतरी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.
गत आठवड्यात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन ती रद्दबातल करण्यात आली. यामुळे माळेगाव कारखान्याची निवडणूक जाहीर करा, असे आदेश सहसंचालक साखर पुणे यांनी निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांना पत्राद्वारे दिले होते. मात्र आदेश देऊन आठवडा झाला, तरी ही माळेगाव कारखान्याची निवडणूक जाहीर झाली नाही.
बेरजेचे राजकारण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण करत त्यांचे विरोधक छत्रपती कारखान्याचे पृथ्वीराज जाचक यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. तोच फॉर्म्युला माळेगाव कारखाना निवडणुकीत वापरणार का? याबाबतीत सुरस कथा ऐकायला मिळत आहेत. मात्र, विरोधक गुरू-शिष्य जोडी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. तर शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू आहे. मात्र, निवडणूक जाहीर झाल्यावरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल.