केडगाव: मागासवर्गीय समाजातील मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे संबंधित मुलीने तक्रार करू नये म्हणून तिच्याशी लग्न करून नंतर संबंधित मुलाने थेट सौदी अरेबियाच गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी संबंधित युवकासह त्याच्या आई, वडील, मामा आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
मूळच्या धुमाळवाडी येथील आणि सध्या पुण्यातील हडपसर येथे वास्तव्यास असलेल्या एका २७ वर्षीय पीडितेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार संबंधित युवक विक्रम हनुमंत कदम, वडील हनुमंत यल्लाप्पा कदम, आई जयश्री हनुमंत कदम, मामा किरण हजारे आणि कावेरी चेतन ननवरे यांच्यावर माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील एका मुलीला विक्रम कदम याने भावनिक करत आणि लग्नाचं आमिष दाखवत वेळोवेळी पुण्यातील कामशेत येथील वृंदावन रिसॉर्ट आणि स्वारगेट येथील नटराज लॉजमध्ये नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाल्यानंतर तिच्यावर दबाव आणून तिचा गर्भपातही केला.
तसेच आरोपीचे वडील हनुमंत यल्लप्पा कदम, जयश्री हनुमंत कदम, किरण हजारे, कावेरी चेतन ननवरे यांच्याशी संगनमत करून मागासवर्गीय समाजातील असल्याने लग्नास नकार दिला. तसेच याबाबत तक्रार देऊ नये यासाठी पैशाचे आमिष दाखवले. मात्र, पीडितेने पैशांना नकार दिल्यामुळे लग्नानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल न होता केवळ हुंडाबळीचा गुन्हा दाखल होईल, या उद्देशाने विक्रम कदम याच्यासोबत तिचे लग्न लावून देण्यात आले.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी लग्न झाल्यानंतर विक्रम हा पीडितेशी कोणतेही संबंध न ठेवता सौदी अरेबिया येथे निघून गेला. १४ एप्रिल ते २० नोव्हेंबर २०२३ दरम्यान हा प्रकार घडला. मुलगा सौदी अरेबियाला निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पीडितेला घरात अस्पृश्यतेची वागणूक देत जातीवरून हिणवत ३१ डिसेंबर २०२३ रोजी घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.
या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर पाच जणांवर अॅट्रॉसिटी, बलात्कार, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक देविदास साळवे यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.