पुणे : लोककला क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतात. यंदाचे वर्ष पुरस्काराचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यामध्ये ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच इतर काही पुरस्कारांची घोषणाही यावेळी करण्यात आली.
लावणी गायिका व नृत्यांगना शोभा इस्लामपूरकर यांना लोकसाहित्यिक डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार, लावणी नृत्यांगना व गायिका वैशाली वाफळेकर यांना पवळा पुरस्कार तर शाहीर बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार प्रसिद्ध ढोलकी वादक कृष्ण मुसळे यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे व महोत्सव समिती अध्यक्ष मित्रावरून झांबरे यांनी दिली.
पुरस्काराचे हे २५ वे वर्ष आहे. शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार २१००० रुपये, डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार व पवळा पुरस्कार प्रत्येकी १५००० रुपये व बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार ११००० रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्ताने दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत लावणी महोत्सवाचे आयोजनही केले आहे.
मालती इनामदार यांचं तमाशा क्षेत्रात भरीव योगदान
तमाशा क्षेत्राला गौरव प्राप्त करून देणाऱ्या विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मालती इनामदार यांनी तमाशा क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे. गेली अनेक वर्ष तमाशा फडाच्या माध्यमातून लोककलेची सेवा केलेली आहे. इस्लामपूर येथील शोभा इस्लामपूरकर यांनी पारंपारिक लावण्याच्या माध्यमातून लावणीचे लावण्य उलगडून दाखवले आहे.
शोभा इस्लामपूरकर यांना जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार
संगीत बारी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शोभा इस्लामपूरकर यांना जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. लावणी नृत्यांगना व गायिका वैशाली वाफळेकर यांनी लावणी स्पर्धेतील अनेक पारितोषिके मिळवून पारंपरिक लावणीला उर्जित अवस्था प्राप्त करून दिलेली आहे. विविध लोककला महोत्सवात आयोजित स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली आहेत.
उत्कृष्ट ढोलकी वादन करणारे कृष्णा मुसळे
प्रसिद्ध ढोलकी वादक पांडुरंग घोटकर यांचे चिरंजीव ढोलकी वादक कृष्णा मुसळे यांना भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा, भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. टीव्हीचे रियालिटी शो व अनेक चित्रपटांमध्ये त्याबरोबर तमाशा क्षेत्रासाठी त्यांनी उत्कृष्ट ढोलकी वादन करून आपली ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी आपल्या ढोलकी वादनाने देश-विदेशात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे.
शिवदास शेटे यांचा विशेष सन्मान होणार
लोककलावंतांना सहकार्य करणारे शिवदास शेटे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समितीचे सदस्य म्हणून लोककलावंत रेश्मा परितेकर, कविता बंड, उन्मेष बारभाई यांनी काम पाहिले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, संदीप घुले, बापू जगताप, कृष्णा ढेरंगे, कुमार औताडे यांनी दिली.
या लावणी महोत्सवात डॉ. गणेश चंदनशिवे, राजू तांबे व राहील तांबे निर्मित आर्यभूषण तमाशा थिएटर ग्रुप, शोभा छाया इस्लामपूरकर नूतन सांस्कृतिक कला केंद्र इस्लामपूर, रेश्मा वर्षा परितेकर, जय अंबिका कला केंद्र सणसवाडी, पप्पू बंड निर्मित ढोलकीचा खणखणाट घुंगराचा छानछानट, वैशाली वाफळेकर व कृष्णा मुसळे हे कलावंत आपली कला सादर करून शाहीर पठ्ठे बापूरावांना आदरांजली अर्पण करणार आहेत.
शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने अनेकजण सन्मानित
प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने लीला गांधी, शकुंतला नगरकर, छाया खुटेगावकर, संजीवनी मुळे, रघुवीर खेडकर, सुरेखा पुणेकर, सरस्वतीबाई कोल्हापूरकर, अमन तांबे अशा जुन्या पिढीतील नामवंत कलावंताना सन्मानित करण्यात आले आहे.