विचार तुमचे, लिखाण आमचे…
- किरणताई वळसे
मकर संक्रातीचा ‘वाण’ वसा
सौभाग्यवतींपुरता मर्यादित नसावा…
महिलांनी संक्रांतीचे वाण देताना निव्वळ भेटवस्तू देऊ नये. अनुभवी महिलांनी आपल्या ज्ञानाची शिदोरी इतर महिलांना द्यावी. समाजात वावरताना कसे वागावे, वडीलधाऱ्या, अनुभवी व्यक्तींशी अदबीने कसे बोलावे, कार्यक्रमानुसार आपला पेहराव कसा असावा… इथपासून ते घरी एखादे कार्य असताना तुम्ही सर्वांशी समरसतेने कसे बोलले पाहिजे, अशा अनेक गोष्टींचे आदान-प्रदान होणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांनी एकत्र येऊन संक्रातीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी जे ज्ञान अर्जीत केले आहे, ते सर्वांना दिले पाहिजे. हे वाण भविष्यात आयुष्यातील घडामोंडीसाठी उपयोगी पडणारे असावे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते… या उक्तीनुसार संक्रांतीचे वाण म्हणून ज्ञानदानाचा प्रचार आणि प्रसार करणे, हाच संक्रांतीचा शुभेच्छा संदेश आहे.
संक्रांतीला सौभाग्यवती महिला एकमेकींना वाण देतात. परंतु ज्या सौभाग्यासाठी त्यांनी आयुष्यभर जिवाचे रान केले, त्यांच्या जाण्यानंतर या सणाला तीने का हिरमुसून रहावे? सौभाग्याचा हा सण सर्वच महिलांनी साजरा केला पाहिजे. विशेष म्हणजे सौभाग्यवती महिलांनी आपल्या इतर भगिनींना त्यात समाविष्ट करून घ्यावे. तरच खऱ्या अर्थाने मकरसंक्रांतीच्या सणाला अर्थ प्राप्त होईल. विवाह झालेल्या स्त्रीला सौभाग्यवती असे म्हटले जाते. मग ज्या महिलेने आपले सौभाग्य गमावले आहे, तिला दुर्भाग्यवती म्हणायचे का? सौभाग्याचा हा सोहळा सर्वांसाठी सारखाच असावा. फरक एवढाच की सौभाग्यवती महिलांनी पतीच्या आयुष्यासाठी तर पती गमावलेल्यांनी त्यांच्या आठवणीत हा सण साजरा करावा.
ज्या स्त्रीने आयुष्यभर पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याची साथ दिली. सुखदुःखात प्रत्येक वेळी त्याची सोबत केली, त्याच स्त्रीची पतीच्या जाण्यानंतर अवहेलना होऊ नये. इतर सौभाग्यवती स्त्रियांपेक्षा ती वेगळी आहे, ही भावना तिला वेदना देणारी आहे. त्यामुळे साऱ्यांनी एकत्रित येऊन हा सोहळा साजरा करावा. विधवा महिलेने कुंकू लावू नये, अशा बोचऱ्या कल्पनांना तिलाजंली दिली पाहिजे. सौभाग्य नवऱ्याच्या जिवंतपणाशी नव्हे तर वैचारीकतेशी संबंधित असावे. महिलांनी एकमेंकींना नीतीमत्तेचे वाण द्यावे. एकीकडे पतीला सौभाग्य मानून एकमेकींना वाण देतो आणि दुसरीकडे फ्री लाईफ जगण्याच्या गोष्टी करतो. ही दोन टोके एकत्रित कशी राहू शकतील, याचा विचार केला पाहिजे. हळदी-कुंकवाला सौभाग्यलंकार न म्हणता फक्त अलंकार म्हटले पाहिजे. हा कार्यक्रम फक्त सौभाग्यवतींपुरता मर्यादित राहू नये, एवढीच अपेक्षा आहे.
- (शब्दांकन : युनूस तांबोळी)