पुणे : रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) व मेमू (मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) या रेल्वे गाड्यांना कोरोनोच्या काळात एक्सप्रेसच्या तिकिटाचे दर लावले होते. मात्र, प्रवाशांच्या मागणीनुसार, आता या गाड्यांना पूर्वीप्रमाणे पॅसेंजरचे तिकीट दर लागू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे गुरुवारपासून (ता. २२) त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे ‘डेमू’चा प्रवास आता स्वस्त आणि मस्त झाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रवाशांवर निर्बंध आणले. त्यावेळी कमीत कमी प्रवाशांनी रेल्वे प्रवास करावा, या हेतूने रेल्वे बोर्डाने तिकिटाचे दर वाढविले होते. यासह जनरल तिकिटाची विक्री देखील बंद केली होती. मात्र, आता सर्व सुरळीत सुरू आहे. प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे. पुणे विभागात रोज सुमारे २७ डेमू व मेमू रेल्वे गाड्या धावतात. यातून दररोज सुमारे ३० ते ४० हजार प्रवासी प्रवास करत आहेत.
या पार्श्वभूमीवर कोरोना काळातील वाढलेले तिकिट दर अद्याप कमी न केल्याने प्रवाशी नाराज होते. डेमू आणि मेमूच्या दर्जात कोणताही बदल न होता केवळ तिकीट दरात वाढ झाल्याने सामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. पॅसेंजरचे किमान तिकीट दर १० रुपये आहे, तर एक्स्प्रेसचे तिकीट दर ३० रुपये प्रति प्रवासी आहे. आता ‘डेमू’ व ‘मेमू’ला देखील किमान तिकीट दर १० रुपये लागू झाला आहे. तिकिटांचे दर कमी झाल्याने पुण्याहून ‘डेमू’ने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.